काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात मोठे मंत्रिपद देऊन स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न असला तरी राज्यात मात्र काहीतरी वेगळेच शिजत असल्याचे दिसत आहे. शिंदेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून निवेदकाने पुकारल्यानंतर भाषणासाठी माईकवर आलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना शिंदेंनी माघारी पाठविल्याने खळबळ उडाली आहे. काहींनी गटबाजी आता भर मंचावर देखील दिसू लागली असल्याचे म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त शिवपुरीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा यांना भाषणासाठी बोलविण्यात आले. या काळात शिंदे काहीसे अस्वस्थ, ओठ दाबलेले दिसत होते. शर्मा व्यासपीठावर जाऊ लागताच लगबगीने शिंदे देखील उठून त्यांच्या मागे आले.
शर्मा माईकचा ताबा घेणार तोच, शिंदेंनी त्यांना मला भाषण द्यायचे आहे, तुम्ही जा अशा अविर्भावात त्यांना माघारी जाण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर काँग्रेसने यावर शिंदे आणि भाजपाला लक्ष्य केले आहे. काँग्रेस प्रवक्ते पीयूष बबेले यांनी हा व्हिडीओ पोस्ट करून भाजपातील वाद आता मंचावर आल्याचे म्हटले आहे.
सिंधिया यांनी प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांच्या भर मंचावरील माईक हिसकावून घेतला. शिवराज हात चोळत राहिले. कालपर्यंत ज्यांना विभीषण म्हणत होते, ते आता नाभीवर बाण सोडत आहेत. जात असलेल्या सत्तेचा अखेरचा फायदा उठविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे बबेले म्हणाले.