मध्यप्रदेशातील भाजप नेते म्हणाले, पोटनिवडणूक भारत-पाक लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:16 AM2019-10-02T04:16:18+5:302019-10-02T04:16:32+5:30
आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशावरून भाजपचे नेते गोपाल भार्गव यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
भोपाळ/झाबुवा (मध्यप्रदेश) : आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशावरून भाजपचे नेते गोपाल भार्गव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. २१ आॅक्टोबर रोजी झाबुआ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांथा राव यांनी मंगळवारी सांगितले की, भार्गव यांनी केलेल्या विधानामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर त्याची नोंद घेत जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ३० सप्टेंबरच्या रात्री गुन्हा दाखल झाला.
मध्यप्रदेश विधानसभेत भार्गव हे विरोधी पक्षनेते आहेत. ही पोटनिवडणूक काही सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील नसून ती पाकिस्तान आणि भारत यांच्यातील लढाई आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भार्गव यांनी सोमवारी केला होता. (वृत्तसंस्था)