भोपाळ : देशातील जनता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळली आहे. त्यात दिलासा देण्याऐवजी मध्यप्रदेशातील मंत्री ओमप्रकाश सकलेचा यांनी जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे वक्तव्य केले आहे. आता त्रास होत आहे. मात्र, त्याशिवाय आनंद उपभोगता येणार नाही, असे सकलेचा म्हणाले.
देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पूर्ण केली आहे. प्रमुख शहरांमध्येही पेट्रोलचे दर शंभर रुपये प्रति लिटरहून अधिक आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोलसोबतच डिझेलच्या दरांनीही शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे महागाईदेखील आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत जनतेला दिलासा देण्याऐवजी महागाईच्या जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे वक्तव्य सकलेचा यांनी केले.
इंधन दरवाढीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की त्रासामुळे आनंदाची जाणीव होते. जर त्रास झाला नाही तर तुम्हाला आनंद उपभोगता येणार नाही, असे सांगतानाच सकलेचा यांनी इंधन दरवाढीच्या मुद्यावरून माध्यमांनाच दोषी ठरविले.