VIDEO: "तुझी वर्दी उतरवेन"; भाजप नेत्याच्या धमकीनंतर पोलीस अधिकाऱ्याने फाडले कपडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:37 PM2024-09-16T13:37:02+5:302024-09-16T13:40:24+5:30
मध्य प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश फाडत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Madhya Pradesh Police : मध्य प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप आमदाराने दिलेल्या धमकीनंतर पोलीस अधिकाऱ्याने सर्वासमोरच आपला गणवेश फाडून टाकल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा सगळा प्रकार पोलीस ठाण्याचा आत घडला असून तिथल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला. महत्त्वाची बाब हा सगळा प्रकार सात महिन्यांपूर्वी घडला असून तो आता समोर आला असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात भाजपच्या एका नेत्याने सहाय्यक उपनिरीक्षकाला तुझा गणवेश उतरवून टाकेन अशी धमकी दिली होती. त्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षकाचा संयम सुटला आणि त्याने सर्वांसमोर आपला गणवेश फाडला. हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्याच्या नगर निरक्षकाच्या कार्यालयातील आहे. पोलीस ठाण्याच्या आतच हा सगळा प्रकार घडल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही घटना तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती आणि आता त्याचे फुटेज व्हायरल होत आहे.
सिंगरौली जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात ही घटना २ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली होती. व्हिडिओमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक विनोद मिश्रा वरिष्ठ अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांसमोर त्यांचा गणवेश काढताना दिसत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गटाराच्या
बांधकामावरून वाद झाला होता. एएसआय विनोद मिश्रा यांचा स्थानिक रहिवाशांशी जोरदार वाद झाल्यानंतर पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारी तो मिटण्यासाठी एकत्र आले. मात्र यावेळी भाजप नेते आणि स्थानिक नगरसेविकेचे पती अर्जुन गुप्ता यांनी विनोद मिश्रा यांना तुझा गणवेश उतरवून टाकेन अशी धमकी दिली.
रागाच्या भरात एएसआय विनोद मिश्रा यांनी स्वतःहून आपला गणवेश काढायला सुरुवात केली आणि ही घटना पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. तिथल्या लोकांनी मिश्रा यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटपर्यंत भाजप नेते अर्जुन गुप्ता आणि विनोद मिश्रा यांच्यात वाद सुरुच होता. या सगळ्या प्रकारानंतर पोलिस अधीक्षक निवेदिता गुप्ता यांनी एएसआय मिश्रा यांच्यावर वर्दी काढल्याप्रकरणी कारवाई केली होती.
मात्र आता सात महिन्यांनी हा व्हिडीओ समोर आल्याने त्याची जोरदार चर्चा सुरु झालीय. सीसीटीव्ही फुटेज लीक झाल्याचा आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ तपासण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
यह सत्ता की हनक है...भाजपा के पार्षद की धमक देखिए...एक वर्दीधारी को अपनी वर्दी फाड़ना पड़ गई !!
प्रदेश में पुलिसिंग का स्तर जीरो हो गया है! अपराध अनियंत्रित हैं, अपराधी बेखौफ और पुलिस कहीं लाचार तो कहीं दबाव में है.
यह वायरल वीडियो सिंगरौली के बैढन थाने का बताया जा रहा है, जहां… pic.twitter.com/tCDRUpC3S0— MP Congress (@INCMP) September 16, 2024
विरोधी काँग्रेस पक्षाने हा व्हिडीओ पोस्ट करुन सत्ताधारी भाजपला घेरलं आहे. "ही आहे सत्तेची मग्रुरी, बघा भाजपच्या नगरसेवकाची धमकी, गणवेशधारी व्यक्तीला कपडे फाडावे लागले. राज्यातील पोलिसांची पातळी शून्य झाली आहे, गुन्हेगारी अनियंत्रित आहे, गुन्हेगार निर्भय आहेत आणि काही ठिकाणी पोलीस हतबल आहेत तर काही ठिकाणी दबावाखाली आहेत," अशी पोस्ट मध्य प्रदेश काँग्रेसने केली आहे.