"घरी आणून प्यायला सांगा"; व्यसनमुक्ती अभियानात भाजप मंत्र्यांचा महिलांना अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 11:59 AM2024-06-29T11:59:29+5:302024-06-29T12:00:53+5:30
मध्य प्रदेशात भाजपच्या मंत्र्यांनी व्यसनमुक्ती अभियानादरम्यान महिलांना पतीबाबत अजब सल्ला दिला आहे.
Narayan Kushwaha Advice to Women : मध्य प्रदेशात मद्यावरुन अनेकदा राजकीय खलबते सुरू असतात. मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून दारूबाबत राजकारण तापले आहे. अशातच मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनीही अनेकदा मद्यबंदी करण्याबाबत आक्रमक भूमिका घेताना दिसले आहे. आता मध्य प्रदेशातील आणखी एका मंत्र्याचे मद्याबाबतचे धक्कादायक विधान केलं आहे. व्यनसमुक्ती अभियानात बोलताना भाजपच्या मंत्र्याने महिलांना त्यांच्या पतीचे मद्याचे व्यसन सोडवण्यासाठी अजब सल्ला दिला. भाजपच्या मंत्र्याने दिलेल्या या सल्ल्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
मध्य प्रदेशच्या मोहन यादव सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी महिलांना एक अजब सल्ला दिला आहे. कशवाह यांनी महिलांना सांगितले की, तुम्हाला तुमच्या पतीने मद्य पिणे बंद करावे असे वाटत असेल तर घरी आणल्यानंतरच त्याला मद्य पिण्यास सांगा. मुलांसमोर असे केल्यास त्यांना लाज वाटेल आणि ते हळूहळू दारू पिणे बंद करतील. मंत्र्यांनी दिलेल्या अजब सल्ल्याने महिलांनी आश्चर्य व्यक्त केले. तर दुसरीकडे कुशवाह यांच्या सल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भोपाळमध्ये आयोजित व्यसनमुक्ती अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमात मंत्री नारायण सिंह कुशवाह बोलत होते. "जर माता-भगिनींना त्यांच्या पतींनी मद्य पिऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी आधी पतीला बाजारात कुठेही मद्य पिऊ नये असे सांगावे. तुम्ही घरी या आणि माझ्यासमोर खाऊन पिऊन घ्या. जेव्हा पती कुटुंबासमोर मद्य पितो तेव्हा त्याची पिण्याची सवय कमी होते. हळूहळू तो मद्य पिणे बंद करेल, कारण त्याला लाज वाटेल की मी माझ्या पत्नी आणि मुलांसमोर मद्य पितो. भविष्यात तुमची मुले मद्य पितील अशा गोष्टीही त्याला सांगा," असे कुशवाह म्हणाले.
"सामाजिक मूल्यांमुळे अनेकांना हे शक्य होत नाही, मात्र चुकीचे काम थांबवताना मूल्ये आड येऊ नयेत. मद्य पिणाऱ्यांना सिलिंडर दाखवा पण जेवण देऊ नका. महिलांनी एकत्र येऊन लाटणं गँगची स्थापना केली. अमली पदार्थांचे दुष्कृत्य नष्ट करण्यासाठी सर्व धार्मिक आणि आध्यात्मिक संस्थांचे सहकार्य घ्या. यासाठी समाजात जनजागृती करा," असेही मंत्री कुशवाह म्हणाले.