नवी दिल्ली - वादग्रस्त विधानांसाठी सतत चर्चेत असलेल्या भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आजारी असल्याचं सांगत ठाकूर या सध्या व्हिलचेअरवरून वावरत असतात. मात्र आता मंगळवारी दुर्गा पुजेसाठी त्या एका मंडळात गेल्या होत्या आणि तिथे देवीचं दर्शन घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांसोबत त्या गरबा देखील खेळल्या. ठाकूर यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसने (Congress) प्रज्ञा सिंह ठाकूर (BJP Pragya Singh Thakur) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा व्हिडीओ शेअर करत सणसणीत टोला लगावला आहे. "सर्वसामान्य लोक अडचणीत असतात, मदतीसाठी तुम्हाला हाक देत असतात तेव्हाच तुम्ही आजारी असता" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर मंगळवारी रात्री एका ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. देवीचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या महिलांनी ठाकूर यांना गरबा खेळण्यासाठी खूप आग्रह केला. त्यानंतर ठाकूर देखील स्वत:ला थांबवू शकल्या नाही. महिलांसोबत त्या गरबा खेळल्या.
"सर्वसामान्य मदतीसाठी तुम्हाला हाक देतात तेव्हाच तुम्ही आजारी असता"
काँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गरबा एक खेळतानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. "प्रज्ञा सिंह ठाकूर तुम्हाला निरोगी पाहून आनंद झाला. आज तुम्ही गरबा खेळताना दिसल्या. फक्त जेव्हा सर्वसामान्य लोक अडचणीत असतात, मदतीसाठी तुम्हाला हाक देत असतात तेव्हाच तुम्ही आजारी असता. तुम्हाला कोणाच्यातरी मदतीने चालताना पाहून किंवा व्हिलचेअरवर पाहून लोकांनाही दुःख होतं. देव तुम्हाला कायम निरोगी ठेवो" असं म्हणत नरेंद्र सलुजा यांनी ठाकूर यांना सणसणीत टोला लगावला आहे.