भोपाळ - सध्या संपूर्ण देशा कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सेवा हतबल झाल्याचे चीत्र बघायला मिळत आहे. कोरोनामुळे मध्यप्रदेशची स्थितीही गंभीर आहे. राज्यात सीएम शिवराज सिंह चौहानही संपूर्ण प्रशासनासह कंबर कसून कोरोना महामारीचा सामना करताना दिसत आहेत. आता त्यांच्या पक्षानेही या संकट काळात कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर तयार करण्याचे काम सुरू केले आहे. भाजपकडून भोपाळमधील लाल परेड मैदानातील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये एक हजार बेडचे क्वारंटाइन सेंटर तयार केले जात आहे.
ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असेल, त्यांना तो या सेंटरमध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि तत्काळ रुग्णालयांतही पाठविले जाईल. येथे नर्सिंग स्टाफ शिवाय डॉक्टरदेखील 24 तास उपलब्ध राहतील. ही संपूर्ण व्यवस्था निःशुल्क असेल. भाजपच्या काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे रुग्णांना दिवसभर, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र आणि भजन ऐकायला मिळेल. यामुळे येथील वातावरण सकारात्मक होईल आणि रुग्णांचे मनोरंजनही होईल. एवढेच नाही, तर येथे रोज सकाळी आणि सायंकाळी रामायण मालिकाही दाखवण्यात येईल. इंडिया टीव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
काही संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे लोकांना सुरुवातीच्या उपचारांसह सकारात्मक वातावरणही दिले जाईल. ज्या लोकांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसत आहेत आणि घरात आयसोलेट होण्यासाठी जागा नाही, अशा लोकांनाच येथे दाखल करून घेतले जाईल. येथे येणाऱ्या लोकांना केवळ उपचारच नाही, तर दोन वेळचे जेवण आणि चहा-नाश्ताही दिला जाणार आहे.
या दहा राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशामध्ये एका दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १० राज्यांमध्ये सापडले आहेत. या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत २८ कोटींहून अधिक सँपलची तपासणी झाली आहे. तसेच देशातील संसर्गाचा दर हा ६.२८ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ४८ हजार ७०० रुग्ण सापडले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये ३३ हजार ५५१ आणि कर्नाटकमध्ये २९ हजार ७४४ रुग्णांचे निदान झाले आहे.
देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २८ लाख ८२ हजार २०४ वर -मंत्रालयाने सांगितले की, भारतामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढून २८ लाख ८२ हजार २०४ एवढी झाली आहे. तर एकूण बाधिकांची संख्या ही १६.३४ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये आजारी रुग्णांच्या संख्येमध्ये ६८ हजार ५४६ ने वाढ झाली आहे. देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान तामिळनाडू, गुजरात आणि केरळमध्ये आहेत. देशात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी १६.४३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८२.५४ टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
CoronaVirus: बाजारात विकले जातेय बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन, सोफीनं सांगितला fake-original मधला फरक