Manoj Parmar Death : मध्य प्रदेशात सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथे एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी व्यापारी मनोज परमार आणि त्यांची पत्नी नेहा यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आठ दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने इंदूर आणि सिहोर येथील परमार यांच्या चार ठिकाणांवर छापे टाकले होते. यावेळी अनेक जंगम आणि जंगम मालमत्तांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये त्यांच्या मुलांनी राहुल गांधींना त्यांचा पैसा जमा करण्याचा गल्ला दिल्यावर मनोज परमार चर्चेत आले होते.
राहुल गांधींना गल्ला भेट देणाऱ्या मुलांच्या पालकांनी आत्महत्या केल्याने खळबळ उ़डाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथील मनोज परमार यांच्या मुलांनी राहुल गांधी यांना गल्ला भेट दिला होता. यानंतर मनोज परमारचे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आले. अशातच मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीच्या आत्महत्येवर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एक्सवर ट्विट करत ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
"आष्टा सिहोर जिल्ह्यातील मनोज परमार यांना ईडीकडून कोणतेही कारण नसताना त्रास दिला जात होता. भारत जोडो यात्रेदरम्यान मनोज परमार यांच्या मुलांनी राहुलजींना पिगी बँक भेट दिली होती. मनोजच्या घरावर ईडीचे सहायक संचालक भोपाळ संजीत कुमार साहू यांनी छापा टाकला. मनोज यांच्या म्हणण्यानुसार, ते काँग्रेस समर्थक असल्याने त्यांच्यावर छापा टाकण्यात आला. मनोजसाठी मी वकिलाचीही व्यवस्था केली होती. पण अत्यंत दुःखाने सांगावे लागते की मनोज इतका घाबरला होता की आज सकाळी त्याने आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. मी या प्रकरणाची ईडी संचालकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी करतो," असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.
"विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआय भारतीय जनता पक्षाच्या सरकारसाठी शस्त्रे बनली आहेत. सीहोरचे प्रसिद्ध उद्योगपती मनोज परमार ईडीच्या छाप्यांमुळे हैराण झाले होते. आज मनोज परमारने पत्नीसह आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून सरकारी यंत्रणांनी केलेली हत्या आहे," असा आरोप मध्य प्रदेश काँग्रेसने केला आहे. आष्टा पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोटही जप्त केली आहे. सध्या मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये पंतप्रधान स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री युवा कार्यक्रमांतर्गत सर्व्हिस सेंटर आणि रेडिमेड गारमेंट फॅक्टरीच्या नावावर बँकेकडून कर्ज घेऊन ६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. आरोपींनी कट रचून सहा महिन्यांत १८ वेळा कर्ज घेतले. यामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. यामध्ये परमार यांच्या नावाचाही समावेश होता.