शिवपुरी : देशात पूल कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र, पहिल्याच पावसात पूल वाहून केल्याची घटना पहिल्यांदाच घडली असेल. मध्यप्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील कुनो नदीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन पूल बांधण्यात आला. मात्र, हा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे वृत्त आहे. या पूलासाठी जवळपास 7 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
विशेष म्हणजे, 7 कोटी खर्च करण्यात आलेल्या या पुलाचे उद्धाटन तीन महिन्यांपूर्वी एका केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. 29 मे 2018 रोजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. दरम्यान, पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्यामुळे मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल चढविला आहे.
हा पूल खरवाया आणि इंदुर्खी गावांना जोडणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल बांधावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर हा पूल बांधण्यात आला. मात्र, तीन महिन्यातच हा पूल वाहून गेला. त्यामुळे या पूल बांधकामात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.