पन्ना: मध्य प्रदेशातील पन्ना येथे 6 वर्षांपूर्वी झालेल्या बस अपघातात 22 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या अपघातात बसचा दोषी आढळला असून, आता सहा वर्षानंतर न्यायालयाने या प्रकरणी दोषी चालकाला शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी.सोनकर यांनी बसचालक शमसुद्दीन (47 वर्षे) याला तब्बल 190 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला प्रत्येक मृत्यूमागे 10 वर्षांच्या वेगवेगळ्या अटींची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने बसमालक ज्ञानेंद्र पांडे यालाही दोषी ठरवले आहे. त्याला न्यायालयाने 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चालक शमसुद्दीन आयपीसी कलम 304 च्या भाग-2 अंतर्गत दोषी आढळला आहे. प्रदीर्घ सुनावणीनंतर आता निर्णय आला आहे. चालक आणि बस मालक दोघेही सतना जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
असा झाला अपघात
बस अपघात 4 मे 2015 रोजी मांडला येथील राष्ट्रीय महामार्गावरील पांडव धबधब्याजवळ घडला होता. अनूप ट्रॅव्हल्सची (एमपी 19 पी 0533) ही बस 20 फूट दरीत घसरुन उलटली होती. 32 आसनी बस सकाळी 12.40 च्या सुमारास छतरपूर येथून निघाली होती. तासाभरानंतर बस पन्ना जिल्ह्यातील पांडव फॉल्सजवळील एका पुलावर पोहोचली, तिथे चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर बस सुमारे 20 फूट खाली खड्ड्यात पडली. खड्ड्यात पडल्यानंतर त्याला आग लागली आणि 22 प्रवासी जिवंत जळाले.
बराच काळ चालली सुनावणी
या अपघाताप्रकरणी पोलिसांनी बसमालक ज्ञानेंद्र पांडे आणि चालक शमसुद्दीन उर्फ जगदंबे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 279, 304अ, 338, 304/2 आणि 287 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 182, 183, 184 आणि 191 नुसार गुन्हा दाखल केला होता. 6 वर्षे चाललेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.