नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्याबाबत उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. हे असं असतानाच मध्य प्रदेश सरकारच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकूर (Cabinet Minister Usha Thakur) यांनी मदरशांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत असं भाजपाच्या उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे.
"सर्व कट्टरवादी व सर्व दहशतावादी मदरशांमध्ये शिकले व वाढले आहेत. जम्मू-काश्मीरला दहशतवादाचा कारखाना बनवून सोडले होते. असे मदरसे जे राष्ट्रवादाशी समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊ शकत नाहीत, त्यांना आपल्याला योग्य शिक्षणाशी जोडून समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आणले गेले पाहिजे. आसमने हे करून देखील दाखवलं आहे. आसामध्ये मदरसे बंद आहेत. राष्ट्रवादामध्ये जे अडचण निर्माण करत असतील अशा सर्व गोष्टी राष्ट्रहितासाठी बंद झाल्या पाहिजेत. शासकीय मदत बंद झाली पाहिजे" असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे.
इंदूरमध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये उषा ठाकूर यांनी असं म्हटलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि डबरा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुतील भाजपा उमेदवार असलेल्या इमरती देवी यांचे नाव न घेता आयटम असा उल्लेख केला होता. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
'मी माफी का मागू?', राहुल गांधींनी खडेबोल सुनावल्यानंतरही कमलनाथ निर्णयावर ठाम
कमलनाथांच्या विधानावरून अनेकांनी निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या या वक्तव्याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. राहुल यांनी या विधानाबाबत कमलनाथ यांना खडेबोल सुनावले आहेत. कमलनाथ यांनी ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर केला ती आपल्याला अजिबात मान्य नाही. ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.राहुल गांधी यांनी खडेबोल सुनावल्यानंतरही कमलनाथ यांनी माफी न मागण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. "हे राहुल गांधींचं मत आहे" असं म्हणत कमलनाथ यांनी राहुल गांधींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. "हे राहुल गांधींचं मत आहे. ते वक्तव्य करताना काय संदर्भ होता याचं स्पष्टीकरण मी दिलं आहे. त्यात अजून काही सांगण्याचं कारण नाही. जर माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता तर मी माफी का मागावी?, जर कोणाला अपमानित वाटत असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे”.असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे.