नवी दिल्ली - मध्य प्रदेशातीलकाँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बुधवारी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता. मात्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हे दावे फेटाळून लावले असून सरकारला काहीही धोका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपने आधी आपलं बघावं. काँग्रेसने राज्यातील अपक्ष आमदारांसह समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांचे समर्थन मिळवले आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारला राज्यात काहीही धोका नाही, असं कमलनाथ यांनी सांगितले. काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसच्या एका मंत्र्याने केला होता.
उच्च शिक्षणमंत्री जीतू पटवारी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मंत्री नरोत्तम मिश्रा, भूपेंद्र सिंह आणि रामपाल सिंह यांच्यासह काही नेत्यांनी काँग्रेसच्या आमदारांना जबदरस्ती घेऊन गेले होते. त्याआधी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी देखील दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून भाजपनेते माफियांसोबत मिळून राज्यातील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमतात असल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला.