भोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. यानंतर कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेताच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील फाईलवर स्वाक्षरी केली. सत्तेवर आल्यास 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आलं होतं. कमलनाथ यांच्या शपथविधी समारंभानंतर अवघ्या तासाभरात काँग्रेसनं या आश्वासनाची पूर्तता केली आहे. कमलनाथ यांच्या निर्णयाचा लाभ 2 लाखांपर्यंतचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळेल. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. मुख्य सचिव बसंत प्रताप सिंग यांनी अर्थ आणि कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. सध्या राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर 56,377 कोटी रुपयांचं कर्ज आहे. यातील जवळपास 12 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात गेलं आहे. आज दुपारी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जांबुरी मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. कमलनाथ काँग्रेसचे 18वे मुख्यमंत्री आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.