भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या 13 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांची खुर्ची राहणार की जाणार याचीच चर्चा सध्या राज्यात होत आहे. विविध समाज घटकांतील नाराजीमुळे चौहान यांना टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावर त्यांची लोकप्रियता कमालीची होती. त्याचदरम्यान चौहान यांना मामाजी म्हणून संबोधले जाऊ लागले होते.
त्याचे झाले असे की,शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राज्यात स्री सबलीकरणासाठी लाडली लक्ष्मी नावाची योजना सुरू केली होती. राज्यातील गरीब मुलींना या योजनेचा लाभ झाला होता. त्यामुळे राज्यातील मुलींनी शिवराज सिंह चौहान यांना मामाजी म्हणून हाक मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलांनीही त्यांना मामाजी म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशातील राजकारणामध्ये मामाजी म्हणून ओळखले जाऊ लागले. खुद्द शिवराज सिंह चौहान यांनीही विविध मुलाखतींमधून राज्यात आपल्याला मामाजी म्हणून हाक का मारतात, याची माहिती कौतुकाने सांगितली आहे.