कोरोना लस न घेण्याची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा; दिले 'हे' कारण
By देवेश फडके | Published: January 4, 2021 01:47 PM2021-01-04T13:47:36+5:302021-01-04T13:51:26+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची लस न घेण्याची घोषणा केली असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी देशवासीयांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भोपाळ : कोरोना संकाटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडून दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. तसेच देशभरात कोरोना लसीची 'ड्राय रन'ही घेण्यात आली. कोरोना लसींना मंजुरी देण्यात आल्यानंतर लवकरच देशभरात लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची लस न घेण्याची घोषणा केली आहे.
मध्य प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लस देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. राज्यात सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या घडीला कोरोनाची लस न घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. प्राधान्य देण्यात आलेल्या सर्व ग्रुप्सना प्रथम लस देण्यात येईल. नंतर माझा क्रमांक आला पाहिजे. राज्यातील लसीकरण सुनिश्चित केल्यावर कोरोनाची लस टोचून घेईन, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज (सोमवारी) स्पष्ट केले.
#WATCH ...I have decided that I will not get vaccinated for now, first it should be administered to others. My turn should come afterwards, we have to work to ensure that priority groups are administered with the vaccine: Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan pic.twitter.com/EGbkb70iz2
— ANI (@ANI) January 4, 2021
कोरोनाची लस देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. सुरुवातीला आरोग्य सेवक, कोरोना वर्कर, ५० वर्षांपेक्षा अधिक व्यक्ती आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना प्राधान्याने कोरोना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी देशवासीयांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीलाच सीरम कंपनीच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना केंद्र सरकारकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. यानंतर कोरोना लसीवरून राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, जनअधिकार पक्षाचे पप्पू यादव आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांनी कोरोना लसीबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा लस टोचून घ्यावी, अशी मागणीही काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. योगगुरू बाबा रामदेव यांनीही कोरोनाची लस घेणार नसल्याचे म्हटले आहे.