भोपाळ: अवघ्या चार महिनांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिचा हत्या करणाऱ्या नराधमाला इंदोरच्या सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 22 दिवसांमध्ये या प्रकरणाचा निकाल लागला आहे. इंदोरमध्ये 20 एप्रिल रोजी चार वर्षांच्या चिमुरडीवर सुनील भील (21) नावाच्या तरुणानं बलात्कार केला होता. या चिमुरडीचा मृतदेह शिव विलास पॅलेसमध्ये सापडला होता. चार वर्षांची चिमुरडी 20 एप्रिल रोजी तिच्या पालकांसह राजवाडा परिसरात झोपली होती. त्यावेळी सुनीलनं तिचं अपहरण केलं.धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस सुरक्षा असतानाही सुनीलनं चिमुरडीचं अपहरण केलं. सीसीटीव्हीमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्हीत सुनील चिमुरडीला शिव विलास पॅलेसमध्ये नेताना दिसत होता. पहाटे पावणे पाचच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. सुनील शिव विलास पॅलेसमधून एकटाच परतल्याचं दृश्यही सीसीटीव्हीत कैद झालं होतं. सीसीटीव्ही फुटेजमुळे सुनील भीलची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी शिव विलास पॅलेसमध्ये शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना पीडित चिमुरडीचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हत्येपूर्वी चिमुरडीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं. यानंतर सुनीलविरोधात मध्य प्रदेशच्या इंदोर सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. अवघ्या 22 दिवसांमध्ये हा खटला निकाली निघाला असून सुनीलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 6:12 PM