नवी दिल्ली - हल्लीच्या काळात प्रामाणिकपणा फार कमी पाहायला मिळतो. पण अशातच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. मजुराच्या 13 वर्षीय लेकीला 7 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग सापडली आणि तिने ती परत केली आहे. मुलीने प्रमाणिकपणे सापडलेले सोन्याचे सर्व दागिने पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. हे दागिने त्याच्या मालकाला मिळाल्यानंतर त्यानेही खूश होऊन या मुलीला 51 हजार रुपयांचं बक्षिस दिलं आहे. मुलीच्या या वागण्याचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं आहे. पोलिसांनी देखील तिचा सत्कार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील उदयपुरा येथे ही घटना घडली आहे. रीना मंगल सिंह असं या मुलीचं नाव असून ती इयत्ता सहावीच्या वर्गात शिकते. तिचे वडील एक मजूर आहेत. घरची परिस्थिती देखील बेताचीच आहेत. रस्त्यावरून जात असताना मुलीला एक बॅग सापडली. तिने उघडून पाहिलं असता त्यात सोन्याचे काही दागिने होते. मुलीने आपल्या वडिलांसह पोलीस ठाण्यात जाऊन सापडलेले दागिने पोलिसांना दिले आहे. यानंतर पोलिसांनी खऱ्या मालकाला हे दागिने परत केले आहेत. यावेळी खूश झालेल्या मालकाने रीनाला 51 हजारांचं बक्षिस दिलं आहे.
यशपाल पटेल यांच्या मुलीचे दागिने पडले होते रस्त्यावर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी ककरुआ येथील रहिवासी असणाऱ्या यशपाल पटेल यांच्या मुलीचे दागिने नकळतपणे रस्त्यावर कुठेतरी पडले होते. दरम्यान उदयपुरा येथील रीना त्याच रस्त्यावरून पायी घरी चालली होती. यावेळी तिला रस्त्यावर एक बॅग पडलेली सापडली. कुतुहलापोटी बॅगेत काय आहे हे तिने पाहिले. यावेळी बॅगेत लाखोंचे दागिने तिला दिसले. दागिन्यांची बॅग मिळाल्यानंतर, रीना काही काळ तिथेच रस्त्यावर थांबली. पण दागिने शोधण्यासाठी कोणीही त्याठिकाणी आलं नाही.
दागिन्यांची एकूण किंमत 7 लाख रुपये
काही वेळानंतर रीना सर्व दागिने घेऊन आपल्या घरी केली. तसेच तिने वडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर वडील आणि मुलगी त्वरित दागिने घेऊन गावातील प्रतिष्ठित डॉ. मोहनलाल बडकूर यांच्या घरी गेले. येथूनच त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. यशपाल पटेल यांच्या मुलीने दागिने हरवल्याची तक्रार अन्य एका पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी शाहनिशा करून सर्व दागिने खऱ्या मालकाला परत केले आहेत. या दागिन्यांची एकूण किंमत 7 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.