MP CM Mohan Yadav: मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वडिलांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते, अशी माहिती मिळाली आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी व्यक्त वेळापत्रकातून वेळ काढत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आजारी असलेल्या वडिलांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वडिलांचे नाव पूनम चंद यादव असे होते. उद्या, बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांचे वडील पूनम चंद यादव यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. एक्सवर एक पोस्ट शेअर करत, सिंधिया म्हणाले की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली. फक्त एक दिवस आधी त्यांना भेटण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मला मिळाले. मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे वडील पूनम चंद यादव यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. शोकाकुल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. यादव कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली, या शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला.
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. शोकाकुल परिवाराला हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच बाबा महाकालकडे प्रार्थना, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. याशिवाय, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, जीतू पटवारी यांच्यासह अनेकांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वडिलांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले.