Narendra Modi, Shivraj Singh Chauhan: "नरेंद्र मोदी म्हणजे सरदार पटेल अन् सुभाष चंद्र बोस यांचे मिश्रण"; शिवराज सिंह चौहान यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 09:28 PM2022-05-30T21:28:31+5:302022-05-30T21:30:37+5:30
"पंतप्रधान असताना मला मोदींसोबत काम करता येतंय ही खूपच चांगली गोष्ट"
Narendra Modi, Shivraj Singh Chauhan: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट नेताजी सुभाष चंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली. "केवळ महात्मा गांधीच नव्हे तर नरेंद्र मोदी हे सरदार पटेल आणि सुभाष चंद्र बोस यांचे मिश्रण आहेत', असं मोठं विधान शिवराज सिंह चौहान यांनी केलं. सोमवारी एका वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
"तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा, असं सुभाष चंद्र बोस म्हणायचे. पंतप्रधान मोदी म्हणतात की मी भारताला इतरांपुढे झुकूच देणार नाही. याशिवाय, राष्ट्रीय एकात्मता ही सरदार पटेल यांची प्रेरणा होती. पंतप्रधान मोदींनी जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्य भारताला राष्ट्रीय एकात्मतेला धरून देशाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी काम केले. सरदार पटेल यांच्याप्रमाणेच देशाला एकसंध बांधण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले", अशा शब्दात शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या विधानाबाबतचे विचार स्पष्ट केले.
"१९९१ साली जेव्हा एकता यात्रेचे नियोजन करण्यात आले होते, तेव्हा मी खासदार होतो. एकता यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी मोदींकडे होती. मी युवा पिढीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी मी मोदींसोबत खूप वेळा विविध विषयांवर चर्चा केली. तेव्हा मला समजले की मोदी हे अतिशय कल्पक बुद्धिमत्तेचे आहेत. तेव्हापासून आम्ही एकत्रितपणे काम करतोय. पंतप्रधान मोदी हे माझ्याआधी मुख्यमंत्री झाले होते. आता ते पंतप्रधान असताना मला त्यांच्यासोबत काम करता येतंय ही खूपच चांगली गोष्ट आहे. हा प्रवास खूप मोठा आणि अप्रतिम आहे", असेही चौहान म्हणाले.