इंदूर : भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशात उमटू लागले आहेत. मध्य प्रदेशात आंदोलकांनी जवळपास 12 बसेसची तोडफोड केल्याचे समजते.पुण्यातील कोरेगाव भीमा येथील झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेच्या निषेधार्थ काल (दि.3) महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला होता. या पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. यानंतर भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काही संघटनांनी बंद पुकारला आहे. या बंदला काही ठिकाणी दगडफेकीचे गाटबोट लागले आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील पुष्पक बस स्टॅण्डवर काही आंदोलकांनी 12 बसेसची तोडफोड केली आहे. या तोडफोडीदरम्यान एक बसचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, दुसरीकडे आंदोलकांनी राजकोट - सोमनाथ महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले असून याठिकाणी सुद्धा काही बसेसची तोडफोड केल्याचे सांगण्यात येते.
नक्षलवाद्यांनी रचला होता हिंसाचाराचा कट?पुण्यातील भीमा-कोरेगावातील दलित संघटनांच्या आंदोलनामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन केले होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाद निर्माण करुन व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दलित संघटनांच्या आंदोलनाचे लोण पसरावे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे म्हटले जात आहे. भीमा कोरेगावातील हिंसाचार घडण्याच्या बरोबर एक दिवसापूर्वी मुंबईमध्ये नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशनची बैठक 'एल्गार परिषद'चे सीलबंद करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी हा निष्कर्ष काढला आहे.
जिग्नेश मेवाणी आणि उमर खलिद यांच्याविरोधात मुंबईत सर्च वॉरंट गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्याविरोधात मुंबईतील जूहू पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केल्याचे वृत्त आहे. आज छात्र भारतीच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.