मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. जीन्स घालणाऱ्या आणि मोबाईल वापरणाऱ्या मुलींवर नाही तर 40-50 वर्षांच्या महिलांवरच पीएम मोदींचा (PM Narendra Modi) प्रभाव आहे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. दिग्विजय सिंहांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भोपाळमध्ये जन-जागरण शिबिराला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जाते. (Digvijaya Singh on PM Narendra Modi and jeans mobiles women)
या व्हिडिओत, कोणत्या वयाच्या महिलांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे आणि कोणते कपडे घालणाऱ्या मुलींवर पंतप्रधान मोदींचा प्रभाव नाही, हे दिग्विजय सिंह सांगत आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिग्विजय सिंह म्हणत आहेत की, प्रियंका गांधी यांनी एक अतिशय मजेशीर गोष्ट सांगितली होती, जी यापूर्वी आपल्या कधीच लक्षात आली नाही. त्या (प्रियांका गांधी) म्हणाल्या होत्या, की 40 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांवर मोदींचा थोडा अधिक प्रभाव आहे. पण जीन्स घालणाऱ्या आणि मोबाईल वापरणाऱ्या मुलींवर त्यांचा प्रभाव नाही. यावर चर्चा होणे आवश्यक आहे. मोबाईलवर अॅक्टिव्ह असणाऱ्या मुली सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात, यामुळे अशा आपण अशा लोकांशी संपर्क वाढवायला हवा.
दिग्विजय सिंहांचे मानसिक संतुलन बिघडले आहे - भाजप आमदार दिग्विजय सिंह यांच्या पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर, भाजपतूनही प्रतिक्रिया आली आहे. आमदार रामेश्वर शर्मा म्हणाले, दिग्विजय यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. स्त्रियांबद्दलचा त्यांचा हा विचार अत्यंत खालच्या पातळीचा आहे. दिग्विजय सिंह सध्या वेडेपणाच्या फेजमधून जात आहेत. मी सोनिया गांधींना विचारतो की, अशा व्यक्तीला पक्षात ठेवलेच कशासाठी? याच दिग्विजय सिंहांनी काँग्रेस खासदार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांच्याबद्दलही अपशब्द वापरले होते. महिला पूजनीय आणि वंदनीय आहेत, त्यांच्या नावावर राजकारण करणे शोभत नाही.