Calendar Astrology Prediction In MP: देशभरात विविध मुद्द्यांवरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच देशाच्या विविध राज्यातही स्थानिक आणि केंद्रीय पातळीवरील अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. यातच विरोधक सत्ताधाऱ्यांचे सरकार कोसळण्याचे विविध दावे-भाकिते करत असतात. अशातच मध्य प्रदेशातील एका कॅलेंडरमध्ये आलेल्या भविष्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असून, यावरून भाजपने टीका केली आहे.
मध्य प्रदेशमध्ये जबलपूर येथील एका लोकप्रिय पंचांग तसेच कॅलेंडरमध्ये एक भविष्यवाणी करण्यात आली आहे. २०२३ हे वर्ष सुरुवातीपासून उत्तरार्धापर्यंत मुख्यमंत्र्यांसाठी संकटाचे ठरेल. सरकार बदलण्याचे मोठे संकेत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली, तेव्हा चर लग्न काळ सुरू होता. तसेच चंद्र सहाव्या स्थानी सूर्यासोबत युतीत असल्याने त्यांना स्वतंत्रपणे काम करण्यात अडचणी येऊ शकतात. सरकारमध्ये आपापसातील समन्वय नसेल. सत्ताधारी पक्षातील मतभेद वाढताना दिसेल. मंत्रिमंडळात मोठे बदल होऊ शकतात. तर, दुसरीकडे काँग्रेस पक्ष अधिक सक्षम होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम आगामी निवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकतो, असे भाकित या पंचांगात देण्यात आले आहे.
काँग्रेसच्या विजयावर आमचा पूर्ण विश्वास आहे
काँग्रेसने नेहमीच राजकीय मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. मात्र श्रद्धा आणि धर्माचे मुद्दे तसेच पंचांगावरही आमचा विश्वास आहे. काँग्रेसच्या विजयावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस मीडिया सेलचे प्रमुख केके मिश्रा यांनी दिली आहे. तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून या भविष्यवाणीचे जोरदार स्वागत केले जात आहे. शिवराज सिंह चौहान यांनी आता सरकार बदलण्याची तयारी ठेवावी, असा संदेश काँग्रेस पदाधिकारी देत आहेत.
भाजपचा काँग्रेसवर पलटवार
पंचांगातील भविष्यवाणीने एकीकडे काँग्रेसमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, भाजप सरकारचे मंत्री मोहन यादव यांनी यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस मुंगेरीलालसारखे स्वप्न पाहत आहे. हिंदूंचा अपमान करणारी काँग्रेस ही कॅलेंडरच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवत आहे, असा खोचक टोला यादव यांनी काँग्रेसला लगावला आहे.
दरम्यान, पंडित बाबूलाल चतुर्वेदी यांच्या भुवन विजय पंचांगात मध्य प्रदेश सरकारविषयी ही भविष्यवाणी करण्यात आली आहे. याच पंचांगाने हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार येण्याची भविष्यवाणी केली होती, जी खरी झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"