इंदूर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) काँग्रेसच्या एका आमदाराने आपल्या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागातून महिला आणि पुरुषांची एक टीम अयोध्या यात्रेसाठी पाठवली जाणार आहे. या विधानसभा मतदारसंघात दर महिन्याला अयोध्या दर्शन मोहीम राबविण्यात येणार आहे, असे इंदूर-1 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संजय शुक्ला (Sanjay Shukla) यांनी सांगितले.
काँग्रेसचे आमदार संजय शुक्ला (Sanjay Shukla) म्हणाले, "प्रत्येक प्रभागातील नागरिकांना मी महिन्याला अयोध्येला घेऊन जाणार आहे. येथून 600 यात्रेकरूंची पहिली तुकडी 18 डिसेंबर रोजी ट्रेनने प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येला रवाना होणार आहे." याचबरोबर, संजय शुक्ला यांनी असेही सांगितले की, प्रत्येकाने लहानपणापासून रामायण वाचले आणि ऐकले आहे. भगवान रामाच्या जीवनाची संपूर्ण कथा आपल्या सर्वांना परिचित आहे. त्याचे नाट्यरूपांतर सर्वांनी दूरदर्शनवर रामायण मालिकेच्या रूपाने पाहिले आहे. अशा स्थितीत प्रभू राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येला भेट द्यावी आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्या जन्मस्थानी पोहोचून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, अशी देशातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे.
विधानसभा मतदारसंघात एकूण 17 वॉर्ड आहेत. यापैकी एका प्रभागातील नागरिकांना दर महिन्याला अयोध्येला यात्रेसाठी पाठवले जाणार आहे. हे अयोध्या दर्शन अभियान 18 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या दिवशी विधानसभा मतदार संघ क्रमांक एक अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 9 मधील 600 नागरिकांची तुकडी अयोध्येकडे रवाना होणार आहे, असे काँग्रेसचे आमदार संजय शुक्ला यांनी सांगितले.