मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयात अडसर, संधीच्या शोधात भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 10:10 AM2018-12-12T10:10:02+5:302018-12-12T11:13:54+5:30
मध्य प्रदेशमधून भाजपाची सत्ता गेली असली तरी भाजपाला पुन्हा सरकार स्थापण्याचं स्वप्न पडू लागलं आहे.
भोपाळ- मध्य प्रदेशमधून भाजपाची सत्ता गेली असली तरी भाजपाला पुन्हा सरकार स्थापण्याचं स्वप्न पडू लागलं आहे. जवळपास 23 तास सुरू असलेली मतमोजणी संपली असून, काँग्रेसला 114, तर भाजपाला 109 जागांवर विजय मिळाला आहे. सपा 1, बसपा 2 आणि अपक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत सपा आणि बसपासह अपक्ष निर्णायक भूमिका बजावणार आहेत. मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांची सत्ता स्थापनेसाठी अपक्षांवर मदार असणार आहे.
काँग्रेसला बहुमतासाठी फक्त 2 जागांची गरज असून, मायावती काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तर भाजपाला सत्तास्थापनेसाठी आणखी सात जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे अपक्ष, बसपा आणि सपा या पक्षांच्या आमदारांना या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावण्याची संधी आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान आणि अमित शाह मध्य प्रदेशमध्ये संख्याबळाची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे.
मध्य प्रदेश निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदावर दावा करत आले आहेत. कमलनाथ यांच्याकडे काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याची जास्त शक्यता आहे. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं होतं, तर मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार ज्योतिरादित्य सिंधियांना कॅम्पेन कमिटीचे अध्यक्षपद दिलं होतं. परंतु मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांपेक्षा कमलनाथ यांचं वजन जास्त आहे. त्यांच्या प्रचार यंत्रणेतील सक्रिय सहभागामुळेच काँग्रेसला मध्य प्रदेशात एवढं मोठं यश मिळाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राहुल गांधी मुख्यमंत्रिपद कमलनाथ यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.