आधी पत्नी, मग मेहुणीची केली हत्या, पोलीस अधिकाऱ्याचं कृत्य, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:34 PM2024-12-03T17:34:48+5:302024-12-03T17:35:10+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील ऐशबाग परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे मध्य प्रदेश पोलीस दलातील एका एएसआयने त्याची पत्नी आणि मेहुणीची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील ऐशबाग परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे मध्य प्रदेश पोलीस दलातील एका एएसआयने त्याची पत्नी आणि मेहुणीची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. आता फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार एएसआय योगेश मरावी सध्या मंडला येथे सेवेत आहेत. योगेश यांची पत्नी विनिता ही भोपाळमध्ये नोकरी करायची. तसेच ती ऐशबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभात पेट्रोल पंप परिसरात बहिणीसोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती. योगेश याचा मागच्या काही काळापासून पत्नीसोबत वाद सुरू होता.
दरम्यान, सोमवारीनेहमी प्रमाणे घरात घरकाम करणारी महिला आली. तेव्हा विनिता हिने तिला घरात घेण्यासाठी दरवाजा उघडला. तेवढ्यात योगेश हा सुद्धा तिथे आला. तसेच योगेश आणि विनिता यांच्यात वाद सुरू झाला. त्यादरम्यान संतापलेल्या योगेश याने विनितावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या विनिती हिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तो आवाज ऐकून विनिताची बहीण तिला वाचवण्यासाठी आली. मात्र योगेशने तिच्यावरही चाकूने हल्ला केला. हे सर्व एवढ्या वेगात घडले की, कुणाला काही कळलेही नाही. गंभीर जखमी झालेल्या विनित आणि तिच्या बहिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, मृत महिलांच्या घरात काम करणाऱ्या महिलेने याबाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर ऐशबाग पोलीस ठाण्यातील पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. प्रकरणाचं गांभीर विचारात घेऊन पोलीस आयुक्त हरिनारायणचारी मिश्र यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आता फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.