मध्य प्रदेशमध्येअपहरण झालेला शिवाया गुप्ता नावाचा मुलगा सुखरूप सापडला आहे. आता अपहरणकर्त्यांनी त्याच्यासोबत केलेल्या क्रौर्याचा भयावह अनुभव त्याने कथन केला आहे. ‘’ते काका माझं तोंड बंद करून मला घेऊन गेले. त्यांनी मला खूप मारलं. त्यांनी रुमाल बांधून माझे डोळे बंद केले होते. मला गाडीत बसवून खूप फिरवल्यावर ते मला अंधारात एका ठिकाणी सोडून गेले’’, अशी माहिती शिवाय याने दिली आहे. दरम्यान, शिवायचे वडील राहुल गुप्ता यांनी सांगितले की, माझ्या मुलाचं अपहरण झाल्यानंतर कुणीला आमच्याशी संपर्क साधला नाही. आमचं कुणाशीही शत्रुत्व नाही. तसेच हे अपहरण कुणी केलं, हेही आम्हाला माहिती नाही.
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरातील साखर व्यापारी असलेल्या राहुल गुप्ता यांचा ६ वर्षांचा मुलगा शिवाय गुप्ता याचं दोन दुचाकीस्वारांनी गुरुवारी सकाळी अपहरण केलं होतं. शहरातील सीपी कॉलनी येथून दिवसाढवळ्या अपहरण केल्यानंतर आरोपींनी या मुलाला मुरैना जिल्ह्यात अनेख ठिकाणी फिरवलं, मात्र तरीही पोलिसांना आरोपींचा काही सुगावा लागला नाही.
चंबळ जिल्ह्यात पोलिसांनी नाकेबंदी केल्याचा दावा केला होता. तरीही अपहरणकर्ते सुमारे ८० किमीपर्यंत दुचाकीवरून फिरत राहिले. त्यांनी मुलाचं तोंड आणि डोळे बंद करून ठेवले होते. मुलाच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा दिसत आहेत, त्यामुळे त्याला मारहाण झाली असल्याची शक्यता आहे. अखेरीस या अपहरणकर्त्यांनी या मुलाला मुरैना जिल्ह्यातील काजी बसई गावाबाहेर अंधारात सोडून पलायन केले. आता आपल्याकडून सुरू असलेल्या तपासामुळे घाबरून अपहरणकर्त्यांनी या मुलाला सोडल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, काजी बसई गावच्या सरपंचांनी सांगितले की, येथील शेतकरी शेतीला पाणी दिल्यानंतर शेकोटी पेटवून बसले होते. यादरम्यान, अंधारात भयाण शांतता असताना एका मुलाच्या रडण्याचा आवाज त्यांना आला. ते जवळ गेले असता त्यांना शिवाय गुप्ता दिसला. सोशल मीडियावर शिवायच्या शोधमोहिमेसाठी अभियान सुरू असल्याने त्याला ओखळखणं फारसं कठीण गेलं नाही. त्यांनतर या मुलाला सरपंचांच्या घरी आणण्यात आलं. त्यानंतर सरपंचांनी याची माहिती पोलिसांना दिली.
अपहृत मुलगा सापडल्याची माहिती मिळताचा पोलीस महासंचालक अरविंद सक्सेना, डीआयजी अमित सांघी आणि ग्वाल्हेरचे पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह तातडीने मुरैना येथे पोहोचले. तिथे मुलाला ताब्यात घेऊन त्यांनी मुलाला घरी आणून त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले.