भोपाळ: सामाजिक कटुता निर्माण करणाऱ्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. भरस्त्यात, चारचौघांत एखाद्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अशीच एक घटना घडली आहे. इस्लाम नगरमध्ये एका मुस्लिम तरुणीला तिच्याच समाजातील लोकांनी भररस्त्यात बुरखा काढायला लावला. तरुणी ज्या तरुणाच्या स्कूटरवर बसली होती, तो हिंदू असल्याचा संशय उपस्थितांना आला. त्यामुळे त्यांनी थेट तरुणीला बुरखा उतरवण्यास सांगितलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तुझ्यामुळे आमच्या समाजाची बदनामी होत आहे, असं म्हणत उपस्थितांपैकी एक जण तरुणीला बुरखा हटवण्यास सांगत आहे. तर काही महिला जबरदस्तीनं त्या तरुणीला चेहरा दाखवण्यास सांगत आहेत. चारचौघांत अपमानास्पद वागणूक दिली जात असल्यानं तरुणीला अश्रू अनावर झाले आहेत. व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये सुरुवातीला तरुणीनं बुरखा हटवण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या तरुणानं सांगितल्यावर तिनं बुरखा काढला. त्यानंतर उपस्थितांनी तिला हिजाब हटवून चेहरा दाखवण्यास सांगितलं. मात्र तरुणीनं हिजाब हटवला नाही. काही महिलांनी हिजाब हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीनं तरुणाचा आधार घेत चेहरा लपवला.