याला म्हणतात नशीब! खाणीत मौल्यवान हिरा सापडला अन् क्षणात व्यापारी कोट्यधीश झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:55 AM2022-02-22T09:55:51+5:302022-02-22T10:02:38+5:30
Diamond : एका मध्यमवर्गीय व्यापाऱ्याचं नशीब फळफळलं आहे. हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या व्यापाऱ्याला मौल्यवान हिरा सापडला आहे.
नवी दिल्ली - कोणाचं नशीब हे कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये घडली आहे. एका मध्यमवर्गीय व्यापाऱ्याचं नशीब फळफळलं आहे. हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या व्यापाऱ्याला मौल्यवान हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत तब्बल एक कोटी आहे. 26.11 कॅरेटचा हा चांगल्या क्वालिटीचा हिरा असून तो कार्यालयात जमा करण्यात आला आहे. पन्नाचे खनिज आणि हिरा अधिकारी रवि पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी रोजी याचा लिलाव होणार आहे.
हिऱ्यावर जी काही बोली लागेल त्यातून 11.5 टक्के रॉयल्टी कट करून उर्वरित रक्कम ही हिरा मालकाला देण्यात येईल. रातोरात मध्यमवर्गीय व्यापाऱ्याचं नशीब फळफळलं आहे. पन्ना नगरच्या किशोरगंज येथील रहिवासी सुशील शुक्ला यांना 26.11 कॅरेटचा मौल्यवान हिरा सापडला. सुशील शुक्ला जवळपास 20 वर्षे या हिऱ्याच्या शोधात होते. हिऱ्याच्या खाणीत ते मेहनत करत होते. पण त्यांना आतापर्यंत तो कधीच मिळाला नाही. सुशील यांनी फेब्रुवारीमध्ये कृष्णकल्याणपूर येथे हिरा खाणीत शोधायला सुरुवात केली.
26.11 कॅरेटचा मौल्यवान हिरा सापडला
सुशील यांच्यासोबत त्यांचे पाच साथीदार होते. यानंतर 21 फेब्रुवारी रोजी त्यांना 26.11 कॅरेटचा मौल्यवान हिरा अखेर सापडला. यानंतर त्यांना खूप जास्त आनंद झाला. त्यांनी लगेचच हा हिरा कार्यालयामध्ये जमा केला, यानंतर आता येत्या काही दिवसात त्या हिऱ्याचा लिलाव होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मेहनत करत होतो. पण कधी हार नाही मानली, आज त्याचंच फळ मिळालं आहे. आमचं नशीब आता फळफळलं आहे. देवाची मर्जी असल्यानेच आम्हाला हा हिरा मिळाला असं सुशील शुक्ला यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.