भोपाळ - मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसेतसे तेथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. जनतेची मतं मिळवण्यासाठी, आश्वासनांची बरसात करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेसनंही आता भाजपाच्या पावलावर पाऊल ठेवत 'राम पथ'बनवण्याच्या मुद्यावरुन व्होटबँकेला आपल्याकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे.
भाजपाचे आश्वासन, काँग्रेस पूर्ण करणार?
''भाजपानं दिलेलं आश्वासन काँग्रेस पूर्ण करेल. जर काँग्रेस सत्तेत आली तर ते राम पथ बनवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेल'', असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपावर निशाणा साधताना केले आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, भाजपा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राम पथ निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर राम पथ बनवण्यावर नक्की काम करू आणि हा पथ मध्य प्रदेशच्या अंतिम सीमेपर्यंत बनवण्यात येईल.
(साधू-संत निवडणुकीच्या 'आखाड्यात'; अनेकांना भाजपाकडून हवं तिकीट)
''भाजपावाले धार्मिक लोक नाहीत. गावा-गावात गायींची काय हालत झालीय, हे जाऊन पाहावे. शेताची नासधूस होऊ नये, यासाठी शेतकरीदेखील रात्र-रात्र शेतात राहून पहारा देत आहेत'', असे म्हणत त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला.