संघ दहशतवादाचं प्रतीक, महात्मा गांधींचा मारेकरी; काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 03:02 PM2018-11-13T15:02:57+5:302018-11-13T15:05:02+5:30
मध्य प्रदेशात संघाच्या मुद्यावरुन भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने
भोपाळ: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील वातावरण तापलं आहे. भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील दोन प्रमुख पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्यावरुन आमनेसामने आले आहेत. संघ दहशतवादाचं प्रतीक असून त्यांचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असं खळबळजनक विधान काँग्रेस आमदार सुंदरलाल तिवारी यांनी केलं आहे. यामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
रिवा जिल्ह्यातील गुढ मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे आमदार सुंदरलाल तिवारी यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महात्मा गांधींची हत्या केली. ही संघटना देशात द्वेष पसरवण्याचं काम करतेय. धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकावण्याचं काम संघाकडून सुरुय. संघानं कधीही तिरंगा फडकवलेला नाही. संघ हा दहशतवादाचं प्रतीक आहे,' असं तिवारी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो.
RSS is the organization that killed Mahatma Gandhi. They’re creating an environment of hatred in the country on religious lines. They never hoisted the Indian flag; they’re the symbol of terrorism: Sunderlal Tiwari, Congress MLA from Madhya Pradesh's Rewa pic.twitter.com/AZu0YrlQdM
— ANI (@ANI) November 13, 2018
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवरुनही भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. सत्तेत आल्यास सरकारी ठिकाणी शाखांवर बंदी घालू, असं वचन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं आहे. यावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. संघाच्या शाखा सरकारी कार्यालयातही भरतील, असं सिंह यांनी म्हटलंय.
मध्यप्रदेशात सत्तांतर झाल्यास सरकारी जागांवर भरणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालू, असं आश्वासन काँग्रेसकडून जनतेला देण्यात आलंय. यावरुन शिवराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील आणि सरकारी कर्मचारीदेखील शाखांमध्ये सहभागी होतील. यावर कोणीही बंदी आणू शकत नाही, असं सिंह यांनी म्हटलं आहे. ते खरगोनमध्ये बोलत होते.
खरगोन जिल्ह्यातील एका प्रचारसभेत शिवराज सिंह यांनी सोमवारी भाषण केलं. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल आणि त्यातील शाखांवरील बंदीच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला. यावेळी सरकारी कार्यालयांमध्येही शाखा भरतील, असं उत्तर त्यांनी दिलं. 'फक्त सरकारी कर्मचारीच नाही, तर प्रत्येक देशभक्त शाखेत जाऊ शकतो. कारण संघ ही देशभक्तांची संघटना आहे,' असं सिंह यांनी म्हटलं.