भोपाळ - दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आता आम आदमी पक्षाने इतर राज्यांमध्ये हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. गोवा, गुजरात यासारख्या राज्यात स्थानिक पातळीवर यश मिळवल्यानंतर आता आम आदमी पक्षाने मध्य प्रदेशमध्येही दणक्यात प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत सिंगरौली महानगरपालिकेमध्ये आपच्या उमेदवार राणी अग्रवाल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
राणी अग्रवाल यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवारावर नऊ हजारांहून अधिक मतांनी मात केली. राणी अग्रवाल यांना ३४ हजार ५८५ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार अरविंद सिंह चंदेल यांना दुसऱ्या तर भाजपा उमेदवार चंद्रप्रताप विश्वकर्मा यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
राणी अग्रवाल ह्या आधी भाजपामध्ये होत्या. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपाचा राजीनामा देत आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांनी आपकडून सिंगरौली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्या निवडणुकीत ३२ हजार १६७ मतं घेत त्यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांना कडवी टक्कर दिली होती.