'आप'ची 'चाहत' अधुरी...! मध्य प्रदेशात भाजपा 'सुसाट', अभिनेत्रीचा दारूण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 09:13 PM2023-12-03T21:13:36+5:302023-12-03T21:14:03+5:30
Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशात भाजपाला सत्ता राखण्यात यश आले आहे. २३० जागांपैकी आताच्या घडीला १६५ जागांवर भाजपा आघाडीवर असून पुन्हा एकदा भाजपाला सत्तेच्या चाव्या मिळाल्या आहेत. पण, राज्यात आम आदमी पार्टीला खातेही उघडता आले नाही. मध्य प्रदेशातील दमोह मतदारसंघातून टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे निवडणुकीच्या रिंगणात होती. मात्र, मतदारांनी भाजपा उमेदवाराच्या बाजून कौल दिला अन् पांडेला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर चाहत पांडेने नशीब आजमावले पण तिला अपयश आले. खरं तर व्हायरल डान्समुळे ती मागील काही दिवस प्रसिद्धीच्या झोतात होती.
१७व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण
चाहत पांडे चौथ्या क्रमांकावर राहिली. या जागेवरून भाजपाचे ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या ३६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर काँग्रेसचे अजय कुमार टंडन आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार प्रताप रोहित अहिरवार अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. यांपाठोपाठ चाहत पांडे चौथ्या क्रमांकावर स्थित आहे.
अभिनेत्री चाहत पांडेने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तिने वयाच्या १७ व्या वर्षी पवित्र बंधन या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तेनालीरामन, राधा कृष्णन, सावध इंडिया, नागिन-2, दुर्गा-माता की छाया, अलादीन आणि क्राइम पेट्रोल यासह अनेक मालिकांमध्ये ती झळकली. सध्या ती 'नाथ जेवर या जंजीर' या टीव्ही शोमध्ये महुआची भूमिका साकारत आहे.
मध्य प्रदेशात भाजपा सुसाट
दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मात्र जाहीर केला नाही. पंरतु, २०१८मध्ये भाजपाने मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. परिणामी तिन्ही राज्यात भाजपाचा पराभव झाला. मात्र यावेळी भाजपाने तसे केले नाही. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करणं टाळलं. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवली आणि त्याचा मोठा परिणामही दिसून येत आहे.