'सरकारी कार्यालयांमध्येही भरणार संघाच्या शाखा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 09:43 AM2018-11-13T09:43:53+5:302018-11-13T09:46:30+5:30
विधानसभा निवडणुकीमुळे मध्यप्रदेशात वातावरण तापलं
भोपाळ: मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापू लागलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवरुन भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. सत्तेत आल्यास सरकारी ठिकाणी शाखांवर बंदी घालू, असं वचन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं आहे. यावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. संघाच्या शाखा सरकारी कार्यालयातही भरतील, असं सिंह यांनी म्हटलंय.
मध्यप्रदेशात सत्तांतर झाल्यास सरकारी जागांवर भरणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालू, असं आश्वासन काँग्रेसकडून जनतेला देण्यात आलंय. यावरुन शिवराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील आणि सरकारी कर्मचारीदेखील शाखांमध्ये सहभागी होतील. यावर कोणीही बंदी आणू शकत नाही, असं सिंह यांनी म्हटलं आहे. ते खरगोनमध्ये बोलत होते.
खरगोन जिल्ह्यातील एका प्रचारसभेत शिवराज सिंह यांनी सोमवारी भाषण केलं. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल आणि त्यातील शाखांवरील बंदीच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला. यावेळी सरकारी कार्यालयांमध्येही शाखा भरतील, असं उत्तर त्यांनी दिलं. 'फक्त सरकारी कर्मचारीच नाही, तर प्रत्येक देशभक्त शाखेत जाऊ शकतो. कारण संघ ही देशभक्तांची संघटना आहे,' असं सिंह यांनी म्हटलं.