भोपाळ: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात शाब्दिक टोलेबाजी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपाचे राष्ट्रीय अमित शहांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. २८ नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल? यानंतर राहुल गांधी कुठे असतील? ते देशात कमी अन् परदेशात जास्त असतात. ते तर परदेशी आहेत. ते तुम्हाला साथ कशी देतील? (ये तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाएंगे?), असा चिमटा चौहान यांनी काढला. ते सतनामधील जनसभेत बोलत होते.भाजपा अध्यक्ष अमित शहांनीदेखील राहुल गांधीवर कडाडून टीका केली. राहुल बाबा शेतकरी-शेतकरी करतात. त्यांनी कधी बैल घेऊन शेतात नांगरणी केली आहे का?, तुम्ही सत्तेत असताना तर शेतकऱ्यांना युरियासाठी मारहाण सहन करावी लागली होती, असं टीकास्त्र शहांनी सोडलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रचारसभेदरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर बरसले. मी एकदा चुकून पनामा पेपर्समध्ये शिवराज सिंह यांच्या मुलाचं नाव आलं होतं. मला रमणसिंह यांच्या मुलाचं म्हणायचं होतं. पण माझ्या तोंडून चुकून शिवराज यांचं नाव निघालं. तर शिवराज सिंह यांनी लगेच माझ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. मात्र जेव्हा मी व्यापम घोटाळा, ई-टेंडरिंग घोटाळा, मिड-डे मिल घोटाळा याबद्दल बोलतो, तेव्हा शिवराज सिंह दावा दाखल करत नाहीत. कारण त्यामध्ये तथ्य आहे. त्यांच्या सरकारनं घोटाळे केलेत, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी शिवराज सिंह चौहान सरकारला लक्ष्य केलं.