भोपाळ: राहुल गांधी मंदिरात गुडघ्यावर बसले होते. त्यावेळी हे मंदिर आहे, मशीद नाही, याची आठवण त्यांना पुजाऱ्यांना करुन द्यावी लागली, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेलेले योगी आदित्यनाथ धारमध्ये जनसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राहुल यांच्या मंदिर भेटींवरुन त्यांना लक्ष्य केलं. राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळीही भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतलं होतं. हाच मुद्दा योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा उपस्थित केला. निवडणुका जवळ आल्या की राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळीदेखील त्यांनी हेच केलं होतं. त्यावेळी मंदिरात गेलेले राहुल गांधी गुडघ्यावर बसले होते. तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी हे मंदिर आहे, मशीद नाही, याची आठवण त्यांना करुन दिली, अशा शब्दांमध्ये योगी आदित्यनाथांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
'...त्यावेळी पुजाऱ्यांना राहुल गांधींना सांगावं लागलं; हे मंदिर आहे, मशीद नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 4:20 PM