Madhya Pradesh Naxal Encounter :मध्य प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील बालाघाट जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यात 4 महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. ही चकमक नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या गढ़ी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रौंडा जंगलात झाली. या चकमकीनंतर अनेक शस्त्रे आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलीस आणि हॉक फोर्सचे जवान रोंडा येथील घनदाट जंगलात शोधमोहिम राबवत होते, यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी पोलिस दलावर गोळीबार सुरू केला. जवानांनी लगेच प्रत्युत्तर दिले, ज्यात 4 महिला नक्षलवादी ठार झाल्या. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून एक इन्सास रायफल, एक एसएलआर रायफल आणि एक 303 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. चकमकीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
इतर नक्षलवादी पळून गेलेया चकमकीत इतर नक्षलवादीही जखमी झाले, त्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. जखमी नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंगलात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. या कारवाईत पोलिसांनी हॉक फोर्स, सीआरपीएफ, कोब्रा कमांडो आणि जिल्हा फोर्सचा समावेश केला होता. फरार नक्षलवाद्यांना पकडता यावे यासाठी एकूण 12 हून अधिक पथकांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
सीएम मोहन यादव काय म्हणाले?या कारवाईनंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, मध्य प्रदेश सरकार लवकरच नक्षलग्रस्त भागातून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे सफाया करेल. 2026 पर्यंत राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल.