चारवेळा मुख्यमंत्री, सहाव्यांदा खासदार; केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले शिवराज सिंह चौहान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 07:48 PM2024-06-09T19:48:24+5:302024-06-09T20:01:16+5:30
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
PM Narendra Modi Oath Ceremony :नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी शपथ घेतली. यानंतर मध्य प्रदेशात मामा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आलं. शिवराज सिंह चौहान आता केंद्रीय मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चौहान यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झाले आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. १९९० साली पहिल्यांदा बुधनीमधून निवडणूक जिंकून आमदार झालेले शिवराज सिंह चौहान यांची गणना भाजपच्या ताकदवान नेत्यांमध्ये केली जाते. नव्वदच्या दशकात अखिल भारतीय केशरिया वाहिनीचे संयोजक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली होती. १९९१ मध्ये विदिशामधून दहाव्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून ते पहिल्यांदा खासदार झाले. १९९६ मध्ये चौहान ११ व्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयातील सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले. यानंतर त्यांनी १९९६ ते १९९७ या काळात मध्य प्रदेशात पक्षाचे सरचिटणीसपद भूषवले होते.
#WATCH | BJP leader Shivraj Singh Chouhan sworn in as Union Minister in the Prime Minister Narendra Modi-led NDA government pic.twitter.com/wQj0fPe0Yy
— ANI (@ANI) June 9, 2024
शिवराज सिंह चौहान १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये विदिशा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी २९ नोव्हेंबर २००५ रोजी पहिल्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि २००८ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. १२ डिसेंबर २००८ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. १४ डिसेंबर २०१३ रोजी तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर २०२० चौथ्यांदा मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता २०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदावरुन बाजूला होत त्यांना खासदारकीसाठी मैदानात उतरवण्यात आले आणि त्यानंतर शिवराज सिंह आठ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले.