भोपाळ : राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठविले असून, 16 मार्च रोजी बहुमत बहुमत चाचणी होणार आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये हलविण्यात आलेल्या काँग्रेसच्या 82 आमदारांना आज पुन्हा भोपाळमध्ये आणण्यात आले आहे. मात्र उद्या होणाऱ्या फ्लोर टेस्टपूर्वी या आमदारांची कोराना टेस्ट होणार आहे.
यावर बोलताना कमलनाथ सरकारमधील मंत्री पीसी शर्मा म्हणाले की, जयपूर येथून परत आलेल्या आमच्या आमदारांची वैद्यकीय चाचणी करावी, अशी चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणी आधी या आमदारांची कोरानाबाबतची तपासणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच हरियाणा आणि बेंगळुरूमध्ये गेलेल्या आमदारांची सुद्धा तपासणी केली जाणार असल्याचं ते म्हणाले.
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंनी बंड करत काँग्रेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. एकूण 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला मध्यरात्रीच बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठविले आहे. तर कमलनाथ सरकारसमोरील अडचणींत वाढ झाली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीनंतर कमलनाथ सरकारचे भवितव्य निश्चित होणार आहे.