नवी दिल्ली - भाजपाच्या नेत्या उमा भारती (BJP Uma Bharti) या मद्यविक्री विरोधात आक्रमक झाल्या आहेत. रस्त्यावर उतरून दारूच्या दुकानात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. भोपाळमधील आझाद नगरमध्ये ही तोडफोड करण्यात आली आहे. उमा भारती यांचा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राज्यात दारूबंदी मोहीम सुरू केली आहे. उमा भारती यांनी रविवारी अचानक दारूच्या दुकानात घुसून तोडफोड केली आहे. त्यांनी दगडफेक करून दारूच्या बाटल्या फोडल्या आहेत. दरम्यान, उमा भारती यांचे समर्थकही तेथे घोषणाबाजी करताना दिसले.
उमा भारती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. "भोपाळच्या आझाद नगर बीएचईएलमध्ये मजुरांची एक वस्ती आहे. या भागात दारूच्या दुकानासमोर लोकांची लाईन लागते. जवळच मंदिरे आहेत, लहान मुलांसाठी शाळा आहेत. जेव्हा मुली आणि महिला गच्चीवर उभ्या असतात तेव्हा मद्यधुंद पुरुष त्यांच्याकडे चेहरा करुन उभे राहतात" असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळेच त्या थेट मद्यविक्रीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.
प्रशासनाने प्रत्येक वेळी बंदीचे आश्वासन दिले होते, पण अनेक वर्षांपासून ते केले जात नाही. आज मी प्रशासनाला आठवडाभरात दुकान व परिसर बंद करण्याचा इशारा दिला आहे, असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती या गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात दारूबंदीची सातत्याने मागणी करत आहेत. याआधी देखील त्यांनी अनेकदा दारूबंदीसाठी आंदोलन सुरू केलं होतं. यानंतर पुन्हा एकदा मद्यविक्री विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.