देवाला बळी देण्यासाठी निघालेल्या कुटुंबाची कार नदीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, पण बोकड वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:27 IST2025-04-11T15:21:25+5:302025-04-11T15:27:17+5:30

मध्य प्रदेशात देवदर्शन करुन परतणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Madhya Pradesh Four youths died tragically when a car fell off a river bridge | देवाला बळी देण्यासाठी निघालेल्या कुटुंबाची कार नदीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, पण बोकड वाचला

देवाला बळी देण्यासाठी निघालेल्या कुटुंबाची कार नदीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, पण बोकड वाचला

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातूनअपघाताची विचित्र घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या बोकडाचा मंदिरात बळी देण्यासाठी नेत होते ते या अपघातातून बचावले आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

गुरुवारी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि ती पुलाची रेलिंग तोडून थेट नदीत पडली. एका भरधाव वेगाने येणाऱ्या एसयूव्हीने पुलाचे रेलिंग तोडले आणि ती ३० फूट खोल जाऊन कोरड्या नदीत पडली. या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. पूजेनंतर कुटुंबिय बोकडाचा बळी देण्यासाठी जात होते. त्याचदरम्यान हा अपघात घडला. अपघातात बोकडाचा जीव वाचला आहे. या धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि जखमींच्या बरे होण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून नेमकं काय घडलं याची माहिती मिळू शकेल. "काल दुपारी ३-४ वाजता, चारगव्हाण पोलिस स्टेशन परिसरात एका वाहनाचे नियंत्रण सुटून पुलावरून पडल्याने ४ जणांचा मृत्यू झाला. २ जण जखमी झाले आहेत. हे लोक मंदिरातून परतत होते," अशी माहिती चारगव्हाण पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक प्यासी यांनी दिली.

जबलपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या चारगव्हाण-जबलपूर रस्त्यावर हा अपघात झाला. गाडीत पटेल कुटुंबातील ६ सदस्य होते, जे नरसिंहपूर येथील दादा दरबारात दर्शन करुन बोकडाचा आणि कोंबड्याचा बळी देण्यासाठी जबलपूरला परतत होते. घरी आल्यानंतर कुटुंबिय मटणाची मेजवानी देणार होते. मात्र त्याआधीच अपघाताची भीषण घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेग जास्त असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर एसयूव्ही रेलिंग तोडून कोरड्या नदीत पडली. अपघाताची माहिती मिळताच, चारगव्हाण पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी मोठा आवाज ऐकल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. गाडी खाली पडल्यामुळे तिचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे जखमी आणि मृतदेह बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या.
 

Web Title: Madhya Pradesh Four youths died tragically when a car fell off a river bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.