भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी अविवाहित असूनही त्यांना प्रसुतीवेळी आणि प्रसुतीनंतर महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव आहे, असं मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी म्हटलं आहे. आनंदीबेन यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंतप्रधान मोदी विवाहित असूनही आनंदीबेन यांनी त्यांना अविवाहित म्हटल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. आनंदीबेन मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील टिमरनीमध्ये अंगणवाडी केंद्रातील महिला आणि मुलांना संबोधित करत होत्या. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या विधानाची ऑडियो क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. 'तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी 'त्यांनी' लग्न केलं नाही, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. नरेंद्र भाईंनी लग्न केलेलं नसलं, तरीही प्रसुतीवेळी आणि प्रसुतीनंतर महिलांना आणि मुलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, याची त्यांना कल्पना आहे,' असं आनंदीबेन यांनी म्हटलं आहे. हरदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आनंदीबेन यांनी एका उद्यानाचं लोकार्पणदेखील केलं. आरएसएसशी संबंधित विद्या भारती या संघटनेनं या उद्यानाची उभारणी केली आहे. पंतप्रधान मोदी अविवाहित असणारे असं विधान करणाऱ्या आनंदीबेन यांनी राज्यपालपदी नियुक्त झाल्यानंतर अनेकदा वादात सापडल्या आहेत. चित्रकूट दौऱ्यादरम्यान त्या भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजपाला जास्तीतजास्त मतं कशी मिळतील आणि मोदींचं स्वप्न कसं साकार होईल, यावर आनंदीबेन पटेल बोलत होत्या. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आनंदीबेन यांच्याकडे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र दोन वर्षांनंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आलं.
आनंदीबेन पटेल म्हणतात, मोदी अविवाहित असूनही महिलांच्या समस्या जाणतात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 9:26 AM