Animal Cruelty in MP Guna :मध्य प्रदेशातील (Madya Pradesh) गुना जिल्ह्यातून माणुसकिला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने कुत्र्याच्या छोट्या पिल्लाला जमिनीवर आदळून आणि पायाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. फुटेज व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याची दखल घेतली आणि मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना टॅग करत कारवाईची मागणी केली.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका युजरने पोस्ट केलेल्या व्हिडिओला रिट्विट केले आणि त्यात मुख्यमंत्र्यांना टॅग करुन कारवाईची मागणी केली. या पोस्टला उत्तर देताना सीएम शिवराज सिंह यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर काही वेळातच गुना पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली, सीएम शिवराज (Shivraj Singh Chouhan) यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.
व्हिडिओमध्ये एक तरुण दुकानाबाहेर फूटपाथवर बसलेला दिसतोय, इतक्यात कुत्र्याची दोन पिल्ले त्याच्या जवळ येतात. यावेळी तो एका पिल्लाला उचलून रस्त्यावर आदळतो. एवढ्यावरच न थांबता तो त्याला पायाने चिरडून टाकतो. आता अखेर या आरोपीला अटक झाली आहे. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातून याआधीही मुक्या प्राण्यांवरील हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.