ग्वालियर - केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा इन्स्टाग्राम आयडी शनिवारी हॅक झाला होता. सुमारे तासभर ही स्थिती राहिली. हॅकरने इंस्टाग्रामवर श्रेया अरोरा, असे नाव लिहिले होते. तसेच, शिंदे यांनी काँग्रेसमध्ये असताना दिलेला एक व्हिडिओही पोस्ट केला होता. शिंदेसोबत यापूर्वीही असे घडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे यांचा इंस्टाग्राम आयडी सकाळी 10.45 च्या सुमारास हॅक झाला. यावेळी ते दिग्विजय सिंह यांच्या भागात, म्हणजेच राघोगड येथे जात होते. शिंदे आणि दिग्विजय यांच्यातील वाद नवा नाही. सूत्रांचा तर दावा आहे, की दिग्विजय सिंह यांच्यामुळेच ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
शिंदे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर श्रेया अरोरा असे नाव लिहिण्यात आले होते. तसेच एक जुना व्हिडिओदेखील पोस्ट करण्यात आला होता. शिंदे यांनी मार्च 2020 मध्ये भाजपत प्रवेश केला. तसेच त्यांना 2021 च्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी केंद्रीय मंत्रीही करण्यात आले. तेव्हाही त्यांचे फेसबूक अकाउंट हॅक झाले होते. तेव्हाही एक जुना व्हिडिओ पोस्ट झाला होता. असेच गेल्यावर्षीही ते जेव्हा राज्यसभेवर निवडून गेले होते, तेव्हाही त्यांचे फेसबूक अकाऊंट हॅक झाले होते. या व्हिडिओत शिंदे भाजप सरकारच्या अपयशावर भाष्य करताना दिसत होते.