मध्य प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात! 13 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 11:28 AM2021-03-23T11:28:07+5:302021-03-23T11:31:05+5:30
Madhya Pradesh Accident : जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका बस आणि ऑटो रिक्षाची जोरदार धडक झाली असून यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अपघाताच चार जण गंभीर जखमी झालेत आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मृतांमध्ये महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (23 मार्च) सकाळी ग्वाल्हेरमधील जुनी छावणी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या बसने रिक्षाला समोरून धडक दिल्याने अपघात झाला.
State Government to give Rs 4 lakh each to the family of the deceased and Rs 50,000 to injured: Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan (File photo) pic.twitter.com/47S656knOW
— ANI (@ANI) March 23, 2021
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरुन अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. "ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाची धडक झाल्याने घडलेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच या मृतांच्या नातेवाईकांना हा धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो" असं ट्विट चौहान यांनी केलं आहे.
"मी आणि मध्य प्रदेशमधील जनता या दु:खद प्रसंगी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. त्यांनी स्वत:ला एकटं समजू नये. मध्य प्रदेश सरकारच्यावतीने मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाखांची तर जखमींना मदतनिधी म्हणून 50 हजार रुपयांची मदत केली जाईल अशी माहिती देखील चौहान यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.