- डॉ. खुशालचंद बाहेतीभोपाळ : कफ सीरप किंवा मादक पदार्थ असलेली इतर औषधे वैध कागद पत्रा शिवाय बाळगणे एनडीपीएस ॲक्टप्रमाणे गुन्हा ठरू शकतो. या मादक पदार्थविरोधी कठोर कायद्यात किमान १० वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.२५ एप्रिल २०२१ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी एक मोटारसायकल अडवली. २ स्वार तिच्यावर बसून जात होते. मोटारसायकलच्या झडतीमध्ये ओनरेक्स कफ सीरपच्या १०० मिलीच्या ३० बाटल्या आढळून आल्या. या कफ सीरपमध्ये कोडीन फॉस्फेट हा मादक पदार्थ असतो. दोघांकडे या कफ सीरपची प्रिस्क्रिप्शन किंवा इतर कागदपत्रे नव्हती. त्यांच्याविरुद्ध एनडीपीसी ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (मादक पदार्थ बाळगण्यास बंदी), २१, २२ (अवैधपणे मादक पदार्थ बाळगल्याबद्दल १० वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा) या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊन विशेष न्यायालयात जामीन फेटाळल्यानंतर आरोपीनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्या. राजीवकुमार दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचे संदर्भ देत जामीन फेटाळला.सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयमादक पदार्थ फक्त वैद्यकीय कारणासाठी किंवा संशोधनासाठी बाळगता येतात किंवा त्यासाठी त्यांची वाहतूक करता येते.हे पदार्थ बाळगताना किंवा वाहतूक करताना किंवा तयार करताना कायद्याने निश्चित केलेल्या पद्धतीचाच अवलंब केला पाहिजे.मादक पदार्थ उपचारासाठी नेण्यात येत होते किंवा ताब्यात होते हे सिद्ध करणे बाळगणाऱ्याची जबाबदारी आहे.कफ सीरपची मात्रा थोड्या प्रमाणात होती किंवा व्यावसायिक प्रमाणात होती हे ठरविण्यासाठी कफ सीरपमध्ये किती प्रमाणात मादक पदार्थ आहे हे न पाहता संपूर्ण बाटलीत किती कफ सीरप आहे ते सर्व मादक पदार्थ म्हणुन मोजमाप केले पाहिजे. उदा. कफ सीरपमध्ये ०.१५ ग्रॅम मादक पदार्थ असेल; पण इतर द्रावण मिळून सीरप १०० ग्राम असेल तर कायद्याने १०० ग्राम मादक पदार्थ बाळगले समजण्यात येते. मादक पदार्थाची व्यावसायिक मात्रा बाळगल्याबद्दल कठोर शिक्षेची तरतूद आहे, अशा गुन्ह्यात जामीन देता येत नाही.
अवैध कफ सीरप बाळगणे ‘एनडीपीएस’चा गुन्हा- मध्यप्रदेश हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 5:37 AM