भोपाळ: गेल्या आठवड्यापासून मध्य प्रदेशात सुरू असलेला सत्तासंघर्ष लवकरच संपण्याची चिन्हं आहेत. भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी होताना दिसतंय. त्यामुळे मध्य प्रदेशमधलंकाँग्रेसचं सरकार अल्पायुषी ठरणार हे जवळपास निश्चित झालंय. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे. त्यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत तिथून निघाले. सिंधिया आज संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. आज त्यांचे वडील माधवराव सिंधिया यांची 75 वी जयंती आहे. विशेष म्हणजे माधवराव यांनीदेखील एकेकाळी अशाच प्रकारे काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसमध्ये फारसं महत्त्व दिलं जात नसल्यानं माधवराव यांनी 1993 मध्ये पक्षाला रामराम केला होता. त्यावेळी राज्यात दिग्विजय सिंह यांचं सरकार होतं. माधवराव यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत मध्य प्रदेश विकास काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. मात्र त्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले होते.
सिंधिया यांचं कुटुंब राजकारणात खूप आधीपासून सक्रिय आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आजी राजमाता विजयाराजे सिंधिया काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्या होत्या. मात्र 1967 मध्ये त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी डी. पी. मिश्रा मुख्यमंत्री होते. पक्षाने बाजूला टाकल्याने विजयाराजे सिंधिया जनसंघात गेल्या. त्यांनी जनसंघच्या तिकिटावर गुना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. आता ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या वडील आणि आजी प्रमाणेच काँग्रेस सोडल्याने इतिहासाची पुनरावृत्ती झालीय.
राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप
आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार
'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले
मध्यप्रदेशमध्ये डिसेंबर 2018 पासून काँग्रेसचं सरकार आहे. मात्र सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळत होती. ज्योतिरादित्य मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असूनही त्यांना बाजूला सारण्यात आलं. यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदही देण्यात आलं नाही. त्यामुळे आपल्याला किमान राज्यसभेत पाठवण्यात यावं अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र राज्यातल्या दोन जागांसाठी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी जोर लावत पुन्हा एकदा ज्योतिरादित्य सिंधिया यांना साईडलाईन केलं. काही दिवसांपूर्वी सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेसचा उल्लेख काढला होता. तेव्हापासूनच ते काँग्रेसपासून दूर जातील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.