बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या वादात सापडला आहे. त्याच्या नव्या अॅडवरून सध्या वाद सुरू आहे. आमिरच्या नव्या अॅडवरून लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. आमिर खान आणि कियारा अडवाणी या जाहिरातीत एकत्र दिसत आहेत. हिंदू संघटनांच्या लोकांनी या जाहिरातीमुळे भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. आता या जाहिरातीवरून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी संताप व्यक्त केले आहे.
आमिर आणि कियाराच्या जाहिरातीसंदर्भात बोलताना मध्यप्रतेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, मी विनंती करतो की, काळजीपूर्वक जाहिराती करा. अशा जाहिरातीमुळे विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या जातात, धार्मिक परंपरा आणि चालीरीती लक्षात घेऊन जाहिरात करा. मीही बँकेची जाहिरात बघितली आहे. माझ्याकडेही यासंदर्भात तक्रार आली आहे. आमिर खानकडून सातत्याने अशी विरोधी कामे समोर येत आहेत, आमिर खानची अशी कामे मला योग्य वाटत नाहीत. कुठल्याही धर्माचा अनादर करण्याच अधिकार अमिर खानला नाही.
जाहिरातीत नेमकं काय?एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या जाहिरातीत आमिर आणि कियारा नवविवाहित दाम्पत्याच्या भूमिकेत दिसत आहेत. लग्नानंतर कारमधून ते घरी जात असतात. कारमधून उतरल्यानंतर हे लक्षात येते की, नवरा हा नवरीच्या घरी राहायला आला आहे. वधूच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी तो तिच्या घरी राहायला येतो. मूळात वधू नवऱ्याच्या घरात गृहप्रवेश करण्याची प्रथा आहे. या जाहिरातीत आमिर म्हणतो की, 'शतकांपासून चालू असलेल्या प्रथा चालूच ठेवण्यात काय अर्थ?'
सोशल मीडियावर आमिर-कियारा ट्रोलआमिर खान आणि कियारा अडवाणी त्यांच्या नव्या जाहिरातीमुळे चर्चेत आले आहेत. आमिर आणि कियाराने एयू बँकेसाठी एक जाहिरात शूट केली. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही टीव्ही जाहिरात सोशल मीडियावर ट्रोल केली जात आहे. अशा जाहिरातींसाठी फक्त हिंदू धर्मच का निवडला जातो, असे प्रश्न विचारले जात आहेत. जाहिरातीसोबत आमिर खान आणि कियारा अडवाणी यांनाही सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.