इंदूर - देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या इंदूरमध्ये एक अशी घटना समोर आली आहे, जीने मानवतेलाच मोठा हादरा दिला आहे. मध्य प्रदेशातील या शहरात बेघर वृद्धांना जनावरांप्रमाणे ट्रकमध्ये भरून शहराबाहेर सोडण्यात आल्याची हृदयाला पार पिरवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशावरून तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे.
यासंदर्भात शुक्रवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात इंदौर नगरपालिकेची एक गाडी बेघर वृद्धांना शहराबाहेर देवास हायवेवर त्यांच्या साहित्यासह सोडण्यासाठी आली होती. मात्र, लोकांनी विरोध केल्यानंतर हीच गाडी या वृद्धांना परत गाडीत भरून घेऊन गेली. यासंदर्भात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनीही व्हिडिओ ट्विट करत हा मानतेला कलंक असल्याचे म्हटले होते. तसेच शिवराज सरकारवर निशाणाही साधला होता.
सांगण्यात येते, की नगरपालिकेचा एक ट्रक काही निराधार आणि बेघर वृद्धांना घेऊन शहराबाहेरील इंदौर-देवास हायवेवर पोहोचला. येथे नगरपालिकेचे कर्मचारी या वृद्धांना गाडीतून खाली उतरवू लागले. याच वेळी काही स्थानिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना, या वृद्धांना शहराबाहेर अशा प्रकारे हायवेवर का सोडत आहात, अशी विचारणा केली. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना काहीही उत्तर देता आले नाही.
यासंपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. चौहान यांच्या आदेशानंतर उपायुक्त प्रताप सोलंकी यांच्यासह इतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत, म्हटले आहे, 'आज इंदौरमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून वृद्धांसोबत झालेल्या अमानवीय कृत्याची माहिती मिळाली. या प्रकरणात जबाबदार असलेल्या नगरपालिका उपायुक्तांसह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच इंदौर जिल्हाधिकार्यांना या वृद्धांची देखभाल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वृद्धांसोबत अमानवीय व्यवहार कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. माझ्यासाठी नरसेवा हीच नारायण सेवा आहे. प्रत्येक वृद्धस आदर, प्रेम आणि सन्मान मिळायला हवा. हीच आपली संस्कृती आहे आणि मानव धर्मदेखील.'
यासंदर्भात नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे, की थंडीमुळे या भिक्षूंना योग्य प्रकारे सुरक्षित स्थळी शेल्टरमध्ये हलविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यात हलगर्जीपणा झाला आहे. भविष्यात असे होऊ नये, यासाठी ठोस कारवाई केली जात आहे.