मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जो पाहिल्यावर तुम्हालाही भीती वाटेल. चालता-बोलता कैलास नावाच्या ३२ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली असून सर्वांनाच धक्का बसला आहे.
कैलास एका कंपनीत काम करत होता. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तो कामादरम्यान कंपनीच्या गेटवर पोहोचल्यानंतर बाहेर कोणाशी तरी बोलत असल्याचं दिसत आहे. अचानक तो थोडा वाकतो आणि खाली कोसळतो. त्यानंतर काही लोकांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. सायलेंट हार्ट अटॅकचं हे प्रकरण असल्याचं म्हटलं जात असून पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.
कैलास हा त्याच्या कुटुंबासह पटेल नगरमध्ये राहत होता. त्याला दोन मुलं आहे. या घटनेने कुटंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याआधी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. हे पहिलंच प्रकरण नाही. महिनाभरापूर्वी मध्य प्रदेशातील विदिशा येथेही असाच भयंकर प्रकार समोर आला होता. एक लग्न समारंभ सुरू होता. लोक आनंद साजरा करत होते.
२४ वर्षांची परिणीता तिच्या बहिणीच्या लग्नाच्या आनंदाने स्टेजवर नाचत होती. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण अचानक परिणीता बेशुद्ध पडली आणि खाली पडली. सुरुवातीला लोकांना वाटलं की ती नाचण्याच्या थकव्यामुळे बेशुद्ध पडली असेल पण जेव्हा ती उठली नाही तेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी चेक केल्यानंतर सायलेंट अटॅकने मृत्यू झाल्याचं सांगितलं.