इंदूर: मध्यप्रदेशच्या इंदूरमधील एका वायर कारखान्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आज(गुरुवार) सकाळी कारखान्यातील सात कामगारांनी विष प्राशन केले, त्यांना मालकाने कामावरुन काढून टाकल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. विष प्राशन केल्यानंतर इतर कामगारांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अजमेरा वायर फॅक्टरीची आहे. जमनाधर विश्वकर्मा (46, रा. गौरी नगर), दीपक सिंग (45, रा. गौरी नगर), राजेश मेमारिया (46 रा. नेहरूनगर), देवीलाल करेडिया (45, रा. मालवा मिल), त्याचा भाऊ रवी कारडिया (32), जितेंद्र धामनिया (45 रा. माळवा मिल) आणि शेखर वर्मा (19) यांनी आज सकाळी कारखाना गाठला आणि मालकाला भेटण्याचा आग्रह धरला. मालकाने त्यांना भेटण्यास नकार दिल्याने त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांची प्रकृती खालावल्याचे पाहून इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, येथे सर्वांवर उपचार सुरू आहेत.
सातही कर्मचारी अनेक वर्षांपासून येथे कार्यरत असल्याचे कर्मचाऱ्यांनी चौकशीत सांगितले. बुधवारी कंपनीचे मालक रवी बाफना आणि पुनीत अजमेरा यांनी त्यांना गुरुवारपासून कामावर न येण्यास सांगितले होते. यावरून त्यांचा कर्मचाऱ्यांशी वादही झाला. यानंतर गुरुवारी ते पुन्हा मालकाशी बोलण्यासाठी येथे आले होते. पण, मालकाने त्यांना भेटण्यास नकार दिला.
तपास अधिकारी अजय सिंह कुशवाह यांनी सांगितले की, या कंपनीत 20 कर्मचारी काम करतात आणि कंपनीचे काम गेल्या सात महिन्यांपासून बंद होते. मालकाने कर्मचाऱ्यांना सात महिन्यांचे पगारही दिला नव्हता. इतर कर्मचाऱ्यांसोबत या सात कर्मचाऱ्यांना त्यांच्या बाणगंगा येथील दुसऱ्या कारखान्यात काम देण्यात आले होते. आधी सर्वांनी मान्य केले, पण आज अचानक मजूर आले आणि पिष प्राशन केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.